आज नविन वर्षाचा पहिला उत्सव...सवित्रीचा उत्सव!!
शिक्षणाचा, दूरदृष्टीचा, चिकटीचा, निर्भयतेचा,स्वतंत्रतेचा...म्हणजेच सावित्रीचा उत्सव..
त्याग, जिद्द, ध्येय, संघर्ष, विश्वास, साथ, संयमाचा जागर.. म्हणजेच सावित्रीचा उत्सव..
सावित्रीबाईंचे चरित्र सगळीकडे वाचायला मिळेल, शाळेत, वाचनालयात, नेट वर, कुठेही..
पण ते वाचलेले चरित्र वागायचे कसे, स्वतःमध्ये त्यांचे आचार, विचार, तत्त्व भिनवायचे कसे ते कोणतंही पुस्तक, वाचनालय, इंटरनेट देऊ शकत नाही.
शिक्षण कशासाठी हा प्रश्न आपणच सावित्रीच्या लेकींनी स्वतःला विचारला पाहिजे. हजारो लाखो सुशिक्षित, स्वतंत्र महिला स्वतःची ताकद, बुद्धी, वेळ, कुवत कुठे विसरत आहेत, वाया घालवत आहेत, विझवत आहेत त्यांना जाणीव देखील नाहीये.
अशीच अतिशय वेदनादायी परिस्थिती म्हणजे एकीकडे TV समोर बसून सासू सून नवरा, त्या नवऱ्याची लफडी अशा मालिका बघणाऱ्या, तुफान trp मिळवून देणारा मोठा स्त्रीवर्ग प्रेक्षक सावित्रीबाई ज्योतिबांवर आलेली मालिका अजिबात न बघून trp घटल्याने मालिका बंद पाडायला कारणीभूत होतो...ह्या मानसिकतेचे काय कारण म्हणायचं, कसं शोधायचं? अर्थात कारणं माहीत असतातच आपल्याला. फक्त ते मान्य करायचं नसतं इतकंच.
आज सावित्रीबाईंच्या उत्सवानिमित्ताने, कन्या दिवसाच्या निमित्ताने स्त्रियांनी स्वतःच्या सक्षमतेची परीक्षा घेण्यासाठी स्वतःला खालील प्रश्न विचारावेत-
माझे निर्णय मी घेऊ शकते का?
मी सारासार विचार करू शकते का?
माझ्या निर्णयांमध्ये दूरदृष्टी असते का?
माझ्यावर टीका झाली तर आत्मविश्वास कमी होऊन मी माघार घेते का?
घरातील चुकीच्या वागणाऱ्यांसमोर मी आवाज उठवू शकते का?
माझ्या क्षमतांची मला जाणीव आहे का? माझ्या क्षमता मी वाढवू शकते यावर माझा विश्वास आहे का?
मी घरात, घराबाहेर स्वतंत्र आणि निर्भय आहे का?
मी आई च्या भूमिकेत ठाम आणि सजग आहे का?
मला स्वतःला, मुलांना आणि मोठ्यांना घरात एकच नियम आणि शिस्त आहे का?
वरील प्रश्नांची उत्तरे नाही मध्ये असतील तर शिक्षणासाठी ज्या दांपत्याने आयुष्य वेचलं त्यांच्या कार्याचा उद्देशच आपल्याला कळला नाही असं वाटतं.
शिक्षण म्हणजे स्व-परिवर्तन...कालच्यापेक्षा आज स्वतःला अधिक समंजस, सुस्पष्ट, सामर्थ्यवान, स्वावलंबी बनवणे. आपण घडलो तर घर घडेल, आणि प्रत्येक घर घडलं तर संपूर्ण समाज घडेल इतकं साधं सरळ गणित आपण कसं काय अवघड करून बसतो हे विचारायला भलं मोठं मंथन होण्याची गरज आहे, प्रश्न पडायची आणि ते विचारायची गरज आहे.. हे मंथन घडले नाही तर नुसताच उत्सव होईल, त्या उत्सवातून उन्नती कदाचीतच घडेल.
दीपा
3.1.2021
Comments